महाराष्ट्र प्रीमियर लीग 4 जूनपासून   

पुणे : येत्या 4 जून पासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धांचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतील एमपीएलचा एस पुणेरी बाप्पा हा संघ तर डब्लूएमपीएलचा पुणे वॉरियर्सचा संघ सज्ज झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. रोहित दादा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव कमलेश पिसाळ, अपेक्स कौन्सिल सदस्य विनायक द्रविड, सुहास पटवर्धन, सुनील मुथा, कल्पना तापीकर, सुशील शेवाळे, सीईओ अजिंक्य जोशी, 4एस पुणेरी बाप्पा संघाचे मालक आशिष देसाई, पुणे वॉरियर्स संघाचे मालक मणप्रित उप्पल, आयकॉन खेळाडू रामकृष्ण घोष व यश क्षीरसागर, सातारा वॉरियर्स संघाचे मालक गौरव गढोक, आयकॉन खेळाडू अनुजा पाटील, पुणे वॉरियर्सच्या उपकर्णधार श्वेता माने यांसह महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. रोहित पवार म्हणाले की महाराष्ट्र प्रीमियर लीगमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक नवोदित खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळत आहे. या स्पर्धेमुळे त्यांच्यासाठी भविष्यातील अनेक दरवाजे उघडले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे (एमसीए) राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेटच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रत्येकी 75 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. जिल्हास्तरावर पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी, अनेक नवीन प्रतिभावान खेळाडू निर्माण करण्यासाठी एमसीए सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात क्रिकेट सुविधांचा विकास करून महाराष्ट्र क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी एमसीए सदैव कटिबद्ध आहे.

यावेळी रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेमुळे राज्याच्या कानाकोपर्यात असलेल्या गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर येण्यासाठी संधी मिळणार असून या स्पर्धेमुळे भविष्यात भारतालाही गुणवान क्रिकेटपटू मिळणार आहेत. सलग तिसर्या वर्षी खेळविल्या जाणार्या या स्पर्धेच्या यशात सर्व संघांच्या मालकांचा मोलाचा वाटा आहे. एमपीएल व डब्ल्यूएमपीएल हे केवळ स्पर्धात्मक मंच नसून, एक परिवार आहे. सर्व संघमालक, खेळाडू, पदाधिकारी, टेक्निकल टीम आणि सपोर्ट स्टाफ यांचे परिश्रम या यशामागे आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या साथीने पुणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आम्ही सक्रियपणे काम करत आहोत व भविष्यात आपल्याला सकारात्मक बदल झालेले दिसतील, हा आम्हाला विश्वास आहे. आज पुणे मधील अनेक महिला व पुरुष खेळाडू विविध वयोगटांसाठी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

सर्व सामान्यांसाठी मैदानात मोफत प्रवेश

इतर असोसिएशनच्या स्पर्धांमध्ये सामना पाहण्यासाठी तिकिट विकत घ्यावे लागते. पण एमसीएने मात्र सर्वसामान्य क्रिकेट रसिकांना सामन्यांना आनंद आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर घेता यावा, म्हणून दरवर्षीप्रमाणे मोफत प्रवेश ठेवला आहे.

 

Related Articles